मुंबई – खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे नेहमीच परखड मत व्यक्त करत असल्याने चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या लग्नाच्या एका बातमीमुळे अमोल कोल्हे चर्चेत आले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमोल कोल्हे हे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातमीचा फोटो 1 एप्रिलला त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या बातमीमध्ये ‘खासदार अमोल कोल्हे आणि अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार आहे’, असे लिहिले आहे. या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!’ सध्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर ‘हे काय आहे’, अशी कमेंट केली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील यावर ‘अवघड आहे राव’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अमोल कोल्हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक विषय, अनुभव ते शेअर करत नेटकऱ्यांच्या संपर्कात राहतात.
View this post on Instagram
अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ऐतिहासिक मालिकांमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. काही दिवसांपूर्वीच ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा त्यांचा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला होता.