अमित शहा यांच्या संपत्तीत 7 वर्षांत तिपटीहून अधिक वाढ

गांधीनगर – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत 7 वर्षांत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. शहांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ती बाब स्पष्ट झाली आहे.

गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून शहा प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासमवेत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शहा आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 38 कोटी 81 लाख रूपयांची संपत्ती आहे. शहा दाम्पत्याकडे असणाऱ्या संपत्तीची किंमत 2012 मध्ये 11 कोटी 79 लाख रूपये इतकी होती. सध्या शहा यांच्याकडे 20 हजार 633 रूपये तर त्यांच्या पत्नीकडे 72 हजार 578 रूपये इतकी रोकड आहे.

शहा दाम्पत्याच्या नावावर एकही वाहन नाही. राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारे वेतन, मालमत्तांचे भाडे आणि शेतीविषयक उत्पन्न यांचा उल्लेख त्यांनी उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून केला आहे. शहा यांनी 2017 मध्ये राज्यसभा निवडणूक लढवताना त्यांच्याकडे 34 कोटी 31 लाख रूपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून त्यांच्या संपत्तीत साडेचार कोटी रूपयांची भर पडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.