शिरूर- शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (दि. 13) शिरूर शहरात “रोड शो’ करून प्रचार केला.
अमित शहा यांचा “रोड शो’ असल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून शिरूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.आज सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी शहा यांच्या हेलिकॉप्टरचे शहरात आगमन झाले, त्यानंतर शिरूर बाजार समिती समोर फुलांनी सजवलेल्या रथामधून त्यांचा “रोड शो’ सुरू झाला. “रोड शो’ पेट्रोल पंप, शिरूर बसस्थानक, नगरपालिका कार्यालय, इंदिरा गांधी पुतळा, पोस्ट ऑफिस, विद्याधाम शाळा या मार्गाने जवळ-जवळ 35 मिनिटे सुरू होता. या “रोड शो’ मध्ये मोठ्या प्रमाणात महिला व शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिक मतदार उपस्थित होते.