कोलकता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी सायंकाळी पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी कोलकत्यात दाखल झाले. त्यांच्या दौऱ्यात भाजप आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते. तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या बंगालमधील निवडणूक ३ ते ४ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्याचे महत्व वाढले आहे. भाजपच्या बंगाल शाखेला सज्ज करण्याच्या इराद्याने शहा प्रमुख नेत्यांच्या बैठका घेतील. त्या राज्यात तृणमूलचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भाजप पुढे आला आहे. मात्र, भाजप अद्याप बंगालची सत्ता काबीज करू शकलेला नाही. यावेळी ते स्वप्न साकारण्याच्या उद्देशातून त्या पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दमदार यश मिळवले. त्यामुळे नववर्षी होणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपचा उत्साह दुणावला आहे. बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत त्या निवडणुका होणार आहेत. संबंधित राज्यांपैकी बंगालवर भाजपचा विशेष फोकस राहणार असल्याचे सूचित होत आहे.