Amit Shah | J. P. Nadda | Helicopter – कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा प्रकार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर टीका केली जाते आहे. विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र बिहारच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राज्यात सगळ्यांत प्रथम भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याही हेलिकाप्टरची तपासणी करण्यात आली होती. अनेक मोठ्या नेत्यांना या प्रक्रियेतून जावे लागले असल्याचे आयोगाने म्हटले आहे. बिहारच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की निवडणुकीच्या काळात हेलिकॉप्टरची तपासणी करणे हा एसओपीचा भाग आहे. भाजपचे अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली होती. अशा वेळी केवळ एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांचे हेलिकॉप्टर तपासले गेले असा आरोप करणे निराधार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष शनिवारी बिहारच्या समस्तीपूर येथे होते व त्यांनी काही प्रचारसभाही घेतल्या. त्यांची पहिली सभा समस्तीपूर येथे झाली आणि तेथे त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली त्यानंतर कॉंग्रेसने या विरोधात निदर्शने केली आणि निवडणूक आयोगावर आरोपही केले आहेत. कॉंग्रेसचे नेते राजेश राठोड आरोप करताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना स्वतंत्रपणे फिरू दिले जाते आहे मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जातेआहे. तपासणीच्या प्रकारातून आयोगाचा पक्षपातीपणा दिसून येतो आहे व ही लोकशाहीची हत्या आहे.