नागपूर : महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या एका वर्षात महाराष्ट्राला विकासाऐवजी अराजकता, द्वेष, जाती-जातीतील संघर्ष, कायदा व सुव्यवस्थेचे लक्तर लटकलेले चित्र आणि सरकारी जमिनींची विक्री पाहायला मिळाली, असे घणाघाती आरोप त्यांनी केले. हे वर्ष महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने लक्षात राहील, असे ते म्हणाले. सपकाळ म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. राज्याचा स्वाभिमान दिल्लीच्या सत्तेकडे गहाण ठेवण्यात आला असून 2014 ते 2019 दरम्यानचे देवेंद्र फडणवीस आणि आजचे मुख्यमंत्री यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. आता महाराष्ट्रासाठी काम करण्याची कोणतीही राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे उरलेली नाही. सध्या महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे केवळ ‘रबर स्टॅम्प’ म्हणून काम करत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. राज्यातील प्रशासनाला ‘गलथान कारभार’ म्हणून संबोधत सपकाळ यांनी अनेक उदाहरणे दिली. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा निर्णय सरकार एका वर्षात घेऊ शकले नाही, ही त्यांची असमर्थता असल्याचे ते म्हणाले. राज्याला ‘आका’, ‘खोके’, ‘कोयता गँग’, ‘रेती गँग’ यांसारखी गुन्हेगारी शब्दावली सरकारने बहाल केली असल्याची टीका त्यांनी केली. यामुळे राज्यात गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.