अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. जनतेला आवडणाऱ्या बाबींना विरोध केल्यास मतं कशी मिळतील, असा सवाल त्यांनी केला. लोकसभेत नुकत्याच झालेल्या चर्चेवेळी राहुल यांनी मला अजब प्रश्न विचारला. प्रत्येक निवडणुकीत आमचाच पक्ष (कॉंग्रेस) का हारतो अशी विचारणा त्यांनी केली. संबंधित प्रश्न त्यांनी जनतेला विचारण्याऐवजी मला विचारला. त्यांनी पराभवामुळे थकून जाऊ नये. कारण, कॉंग्रेसला तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांतही हरायचे आहे. देशात पुढील लोकसभा निवडणूक २०२९ यावर्षी होईल. त्यामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजयी होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते गुजरातमधील एका गावात आयोजित सभेत बोलत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकतीच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक ताकदीची प्रशंसा केली. त्यांनी राहुल यांना संघटनात्मक बाबींवर अधिक लक्ष पुरवण्याचा सल्लाही दिला. त्याचाही संदर्भ देऊन शहा यांनी राहुल यांच्याविषयी टिप्पणी केली. जनतेला रूचणाऱ्या बाबींना विरोध केल्यास मतं मिळणार नाहीत हा अतिशय सहजसोपा तर्क आहे. मात्र, तो त्यांना समजावणे माझ्या क्षमतेच्या पलिकडील आहे. कारण, ते कॉंग्रेसजनांनाही जमलेले नाही, असे ते म्हणाले.