Amit Shah : देशातील नक्षलवादाच्या भीषण समस्येला काँग्रेसचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा थेट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सोमवारी लोकसभेत केला. दशकांपासून नक्षलवादाचे संकट घोंगावत असताना आणि त्याचे गांभीर्य मान्य करूनही काँग्रेसने ते संपवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. नक्षलवादाच्या समस्येपासून देशाला मुक्त करण्याचे प्रयत्न या विषयावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडमधील बस्तरमधून नक्षलवाद आता जवळपास संपुष्टात आला आहे, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी (Amit Shah) केली. गेल्या वर्षी अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. Amit Shah on Demography: या डेडलाइनच्या एक दिवस आधी लोकसभेत बोलताना त्यांनी नक्षलविरोधी मोहिमेच्या यशाचा पाढा वाचला. आज बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा आणि रेशन दुकाने उघडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. लाल दहशतीची सावली हटत असून विकासाचा नवा सूर्योदय होत आहे, असे त्यांनी नमूद केले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नक्षलवाद हे काश्मीरपेक्षाही मोठे आव्हान असल्याचे मान्य केले होते. मात्र त्यावर उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरल्याचेही शहा यांनी म्हटले. हिंसेचा मार्ग स्विकारणाऱ्यांना सोडणार नाही मोदी सरकार हिंसाचार कोणत्याही स्वरूपात सहन करणार नाही, असा कडक इशारा गृहमंत्र्यांनी (Amit Shah) दिला. जे शस्त्राचा आधार घेतील, त्यांना त्याची किंमत मोजावीच लागेल. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संविधानाने मार्ग दाखवला आहे, शस्त्र उचलणे हा पर्याय नाही. जम्मू-काश्मीर असो किंवा ईशान्य भारत, हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.