भाजप दक्षिण विस्तारास सज्ज! तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ पक्षासोबत केली युती

AIADMK-BJP alliance | गेली अनेक दिवसांपासून सुरू असेलली AIADMK आणि भाजपच्या युतीची चर्चा अखेर अधिकृत झाली आहे. AIADMK, भाजप आणि मित्रपक्ष आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार आहे. या युतीची घोषणा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.
गेली अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. तामिळनाडूमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपने दक्षिणेत पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
यूतीची घोषणा करताना अमित शहा म्हणाले की, “ही निवडणूक राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आणि राज्यात एडाप्पडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहे. AIADMK आणि भाजप यांची युती नैसर्गिक आहे आणि युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे.
शहा पुढे म्हणाले, “महान नेत्या जयललिता आणि मोदीजींनी पूर्वीही एकत्र काम केले आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तामिळनाडूत पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन होईल. जागावाटपावर अजून चर्चा बाकी असून, भाजप AIADMK च्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते देखील आज युतीची घोषणा करताना उपस्थित होते. अमित शहांनी अन्नामलाई यांचे कौतुक करत तामिळनाडूमध्ये भाजपचे कार्य मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले आहे.
तसेच, याआधी तामिळनाडू भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल याचे संकेत देखील अमित शहांनी दिली. शहा यांनी ट्विट करत प्रदेशाध्यक्षपदासाठी केवळ नागेंद्रन यांचे अध्यक्षपदासाठी एकमेव नामांकन प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे तामिळनाडू भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष नागेंद्रन असतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.





