प्रभात वृत्तसेवा पिंपरी – युवा आमदार अमित गोरखे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. साहित्याचा जागर, सामाजिक बांधिलकी आणि मैत्रभाव जपणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे आमदार गोरखे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पिंपरी-चिंचवडकरांसाठी विशेष ठरला.विविध राजकीय पक्षाचे नेते, कलावंत, साहित्यिक कामगार आणि कष्टकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मांदियाळी उल्लेखनीय होती. सर्वपक्षीय नेत्यांनी गोरखे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. “वाढदिवसानिमित्त साहित्याचा जागर केलेला पहिलाच आमदार, असे वक्तव्य करत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी आमदार गोरखे यांच्या कार्याचा परिचय दिला.राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे भव्य आयोजन मित्र परिवाराकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १०,००० हून अधिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून आमदार गोरखे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अशी जपली सामाजिक बांधिलकी.. वाढदिवस कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग व्यक्तींना सायकलचे वाटप करून करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सामाजिक कार्याच्या या वाटचालीत आमदार गोरखे यांनी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांना ₹५१,००० आणि पूजनीय श्री गुरुजी न्यास यांनाही ₹५१,००० रुपयांचा धनादेश सुपूर्त करून शिक्षण व संस्कार क्षेत्राला बळकटी दिली. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः आमदार गोरखे यांनी स्वीकारली. तसेच आपल्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पापड उद्योगासोबत टायअप करून शेकडो महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम या अभिष्टचिंतन सोहळ्यात जाहीर करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, निगडी आणि चिंचवड परिसरात स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अन्नदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. साहित्य जागर असाही! संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणावर भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. उद्घाटन गिरीष आफळे यांच्या हस्ते पार पडले. त्यामध्ये २० हजारांपेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. हे प्रदर्शन ६ नोव्हेंबर पर्यंत सुरु होते. या प्रदर्शनात कथा, कादंबरी, काव्यसंग्रह वैचारिक व चिंतनात्मक पुस्तकांचा समावेश आहे. ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य रसिकांची गर्दी उसळली होती.