Pune District : रोटरी क्लब नारायणगावच्या अध्यक्षपदी अमित बेनके
Pune District : मावळते अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला.

नारायणगाव : रोटरी क्लब ऑफ नारायणगावच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी वडगाव कांदळी (ता. जुन्नर) औद्योगिक वसाहतीचे तसेच जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांची, तर सचिवपदी प्रसाद बांगर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला.
पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी विवेक दीक्षित होते. यावेळी डॉ. प्रज्ञा भवारी, जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, विश्वस्त प्रकाशमामा पाटे, राजश्री बेनके तसेच रोटरी क्लब ऑफ नारायणगाव, नारायणगाव हायवे, जुन्नर शिवनेरी, आळेफाटा, मंचर, राजगुरुनगर, चाकण, चाकण एअरपोर्ट व भोसरी येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष अमित बेनके यांनी मनोगत व्यक्त करताना कुटुंबीयांची मिळालेली भक्कम साथ, स्वर्गीय वल्लभ बेनके यांचे आशीर्वाद तसेच आई राजश्री बेनके, माजी आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल बेनके, गौरी बेनके आणि धनश्री बेनके यांच्या प्रेरणेमुळे समाजकार्यात कार्य करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. रोटरीच्या माध्यमातून वर्षभर समाजोपयोगी आणि लोकहिताची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी रोटरी फाउंडेशनला एक हजार डॉलरची देणगीही देण्यात आली.
यावेळी विवेक दीक्षित, डॉ. प्रज्ञा भवारी, कृषिरत्न अनिलतात्या मेहेर आणि माजी अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर यांनी रोटरीच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत महाजन व अमृता भिडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी सचिव प्रशांत ब्रम्हे यांनी मानले.
संयम राखून प्रभावी कार्य करा
माजी आमदार अतुल बेनके यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अमित बेनके यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकाळात प्रभावी आणि समाजाभिमुख काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. समाजाची गरज ओळखून कार्य करावे, तसेच कोणत्याही परिस्थितीत संयम आणि शांतता राखून पुढे जावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.





