Pune District : माऊली… माऊली… नामघोषात दिवे घाट सर; पुरंदर तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत
Pune District : माऊलींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात, फुलांची उधळण करत आणि “माऊली... माऊली...” च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

दिवे घाट चढता माऊली नाम घेऊ या ।
टाळ-मृदंगाच्या नादात रंगू या ॥
सावली तुझी देवा वारकऱ्यांवरी ।
पाऊलोपाऊली साथ दे पंढरीवरी ॥
सासवड : “ज्ञानोबा-तुकाराम”, “माऊली… माऊली…” आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने शनिवारी (दि. ११ जुलै) दिवे घाट परिसर दुमदुमून गेला. पुणे येथील मुक्कामानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो वैष्णव भक्तांसह दिवे घाटाची अवघड चढण पार करून सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे दाखल झाला. पुरंदर तालुक्यातील पालखी सोहळ्याचा हा पहिला विसावा ठरला. माऊलींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात, फुलांची उधळण करत आणि “माऊली… माऊली…” च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील मुक्काम आटोपून पंढरपूरकडे प्रस्थान करते तेव्हा दिवे घाट हा वारीतील सर्वांत महत्त्वाच्या आणि अवघड टप्प्यांपैकी एक मानला जातो. उंच चढण, वळणावळणाचा रस्ता आणि मोठ्या प्रमाणावर असलेली गर्दी यामुळे हा प्रवास आव्हानात्मक असतो. मात्र विठ्ठल भक्तीच्या जोरावर वारकरी हा टप्पा उत्साहाने पार करतात. यंदाही लाखो वारकरी अभंग, भारुडे, हरिपाठ आणि नामस्मरण करत दिवे घाट चढताना दिसत होते.
दिंडीतील टाळ-मृदंगाचा निनाद, फुगड्या, रिंगण आणि हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण घाट परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. अनेक वारकरी विठ्ठल नामात तल्लीन होऊन नाचत होते, तर काही जण अभंग म्हणत प्रवासाचा आनंद घेत होते.
झेंडेवाडी येथील विसाव्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. रात्री ८ वाजता झेंडेवाडीतून निघालेली पालखी रात्री उशिरा सासवड येथील पालखी तळावर मुक्कामी दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी सासवड शहर सज्ज झाले होते.सासवड नगर परिषदेच्या वतीने पालखीच्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्यासोबत हभप बाळासाहेब चोपदार, राजेंद्र चोपदार, सोहळा प्रमुख योगिनाथ निरंजन आणि विश्वस्त राजेंद्र उमाप उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या रुपाली झेंडे, पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांसह संभाजी झेंडे, बाबाराजे जाधवराव, सरपंच अमर झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार गौड, तहसीलदार विक्रम राजपूत, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, मावली खटाटे, शिवाजी अजित गोळे, सोनाली झेंडे, पुनम झेंडे, कौशल्या झेंडे, ॲड. नितीन कुंजीर, सारिका झेंडे यांसह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते.
माऊलींच्या आगमनाने झेंडेवाडी, सासवड आणि संपूर्ण पुरंदर तालुका भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. पुढील दोन दिवस सासवड नगरीत वारकरी संप्रदायाचा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळणार असून, विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे.
घाटातील चढण पार करण्यासाठी पाच बैलजोड्यांची मदत
पुणे येथून प्रस्थान केल्यानंतर दिवे घाटातील अवघड चढण पार करण्यासाठी पालखीला पाच बैलजोड्यांची मदत घेण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा जपत बैलजोड्यांच्या सहाय्याने पालखी घाट चढविण्यात आली. पालखी घाट सर करत असताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “माऊली”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
झेंडेवाडीत पुरंदरमधील पहिला विसावा
झेंडेवाडी येथे पालखी पोहोचताच भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पुरंदर तालुक्यातील पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी पालखी थांबल्यानंतर हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. अनेकांनी पालखीसमोर नतमस्तक होत प्रार्थना केली. महिलांनी औक्षण करून माऊलींचे स्वागत केले, तर युवकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. झेंडेवाडी गावासह परिसरातील नागरिकांनी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती.
सासवड नगरीत उत्साहात स्वागत
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी रात्री उशीरा सासवड नगरीत दाखल झाला. पालखीचे आगमन झाल्यानंतर चंदनटेकडी येथे नगरपरिषदेच्या वतीने विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, विणेकरी, चोपदार तसेच पालखी व्यवस्थापनाशी संबंधित मान्यवरांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला. रात्री दहा वाजता पारंपरिक समाजआरतीचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. समाजआरतीनंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवड नगरीत विसावला. उशिरापर्यंत भाविकांनी माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला.





