Satara | वक्तृत्व स्पर्धेत राजापूर शाळेचा अमेय फडतरे जिल्ह्यात प्रथम

पुसेगाव, (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर या शाळा प्रवेश दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून राजापूर ता. खटाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा विद्यार्थी अमेय विकास फडतरे यांने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित तीन वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपले मत सादर करावयाचे होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अमेय फडतरे यांने अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे आठ मिनिटांचे भाषण केले.
आवाजातील चढउतार, विषयानुरूप मांडणी व विविध उदाहरण दाखल्यांद्वारे सादरीकरण देत अमेयने केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याला हे यश संपादन करता आले.
अमेयला मुख्याध्यापक शिवाजीराव कदम, विनोद गोडसे, अजित चव्हाण, सुवर्णा घनवट, वैशाखी साबळे, सपना राऊत, अमित भिसे तसेच धनश्री तापोळे व अमृता शेवते या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल त्याचे गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, शिक्षण विस्ताराधिकारी संगीता गायकवाड, चंद्रकांत सुतार, केंद्रप्रमुख अजित निकाळजे, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले.

