नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. अमेरिका आणि चीन व्यापार युद्ध भडकले आहे. अशा परिस्थितीत भारत आणि चीनचे व्यापारी संबंध सुधारत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताची चीनला झालेली निर्यात तब्बल 33 टक्क्यांनी वाढून 22.27 अब्ज डॉलर या पातळीवर गेली आहे. आतापर्यंत भारत निर्यातीसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. मात्र अमेरिकेने आता आपले दरवाजे बंद केले आहेत. अशा परिस्थितीत चीनने भारतासाठी आपले दरवाजे उघडले आहेत, असे वातावरण निर्माण झाले आहे. चीनला ज्या वस्तूची निर्यात वाढले आहे, त्यामध्ये खाद्यतेल आधारित पदार्थ, समुद्री खाद्य, दूरसंचार उपकरणे आणि मसाल्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल – नोव्हेंबर 2022- 23 दरम्यान भारताची चीनला निर्यात 9.89 अब्ज डॉलर होती. तर 2023- 24 मध्ये या कालावधीत ही निर्यात 10.28 अब्ज डॉलर होती. त्या तुलनेत यावर्षी झालेली निर्यात कितीतरी जास्त झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात जास्त निर्यात झाली आहे त्यामध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड आणि इतर इलेक्ट्रिक उत्पादनांचा समावेश आहे. त्याचबरोबर अॅल्युमिनियम आणि तांब्याची निर्यातही चीनला वाढले आहे. वाणीज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी याकडेवारी बद्दल समाधान व्यक्त करून सांगितले की, फक्त विशिष्ट क्षेत्रातच भारतीय वस्तूची चीनला निर्यात वाढलेली नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूबरोबर कृषी उत्पादने, धातू इत्यादी क्षेत्रातील निर्यातही चीनला वाढले आहे. याचा अर्थ चीनने भारतीय उत्पादने स्वीकारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. आगामी काळात जर भारताची चीनला निर्यात वाढली तर भारताची चालू खात्यावरील तुट कमी होण्यास मदत होणार आहे. अशा अवस्थेत अमेरिकेची दादागिरी कमी होण्यास मदत होईल, असे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले. अमेरिकेवरील परावलंबत्व कमी करण्यासाठी भारत सरकारने विविध देशाबरोबर व्यापार करार करण्याचा सपाटा लावला आहे. चीनबरोबर आतापर्यंत कसलाही व्यापार करार झालेला नाही किंवा व्यापार कराराची बोलणी झाली नाही. मात्र तरीही चीनला होणारी निर्यात वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारत – चीन दरम्यान व्यापार करारावर बोलणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.