इस्रायलला अमेरिका विकणार 20 अब्ज डॉलरची शस्त्रे

वॉशिंग्टन : अमेरिकेने इस्रायलला 20 अब्ज डॉलर किंमतीची शस्त्रे विकण्यास मंजूरी दिली आहे. या शस्त्रांमध्ये लढाऊ विमाने आणि हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या प्रगत क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल सांगितले. त्यात म्हटले आहे की,इस्रायलला केल्या जाणाऱ्या या संभाव्य विक्रीमध्ये 50 पेक्षा जास्त एफ-15 लढाऊ विमाने, प्रगत मध्यम श्रेणीच्या हवेतून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे, १२० मिमी टँक दारुगोळा आणि उच्च स्फोटक मोर्टार आणि लष्करी वाहनांचा समावेश असेल.
हा एक दीर्घकालीन करार आहे. यामध्ये २०२९ पर्यंत एफ-१५ लढाऊ विमाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि एक मजबूत, सज्ज, स्व-संरक्षण क्षमता विकसित करण्यासाठी इस्रायलला मदत करणे अत्यावश्यक आहे, असेही पेंटॅगॉनने म्हटले आहे. इराणमधील हमास नेता इस्माईल हनिएह आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला लष्करी कमांडर फुआद शुकर यांच्या अलीकडील हत्येनंतर पश्चिम आशियात व्यापक युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
या दोन्ही घटनांमुळे इस्रायलविरुद्ध बदला घेण्याच्या धमक्या आल्या आहेत. इराण आणि लेबेनान दोन्ही देशांकडून इस्रायलविरोधात मोठी लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणला संयम बाळगण्याचे आवाहन केले गेले होते. मा६ इराणने हे आवाहन धुडकावून लावले आहे. यामुळे अब्जावधी डॉलरचा शस्त्रास्त्र करार झाला आहे.





