वॉशिंग्टन – सध्याच्या युक्रेन संघर्षाच्या काळात चीनने रशियाला मदत सामग्री पुरवली तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिला आहे. बायडेन आणि जिनपिंग यांनी काल परस्परांशी व्हिडीओ कॉलवर संपर्क साधून प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिल्याची माहिती व्हाइट हाउसच्या प्रवक्त्यांनी दिली. दोन्ही नेत्यांमधील हे संभाषण तब्बल 110 मिनीटे चालले होते.
युक्रेनियन शहरे आणि नागरिकांवर रशियाने क्रूर हल्ले करत सर्वच मर्यादांचा भंग केला आहे असे असताना रशियाला चीनने मदत सामग्री पुरवल्यास त्याचे गंभीर परिणाम चीनला भोगावे लागतील असे बायडेन यांनी जिनपिंग यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मात्र हे परिणाम नेमके कशा स्वरूपाचे असतील याची माहिती देण्यास व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने नकार दिला. अशा परिणामांविषयी जाहीरपणे चर्चा करता येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्यापासून, चीनने त्याचा निषेध करण्यासही नकार दिला आहे. तेव्हापासून चीनने जी आगळीक सुरू केली आहे त्याची आम्ही वेगळी दखल घेतली आहे असे अमेरिकेच्या प्रवक्त्याने सांगितले. अमेरिकेकडून रशियावर काय कारवाई केली जाणार आहे याची माहितीही बायडेन यांनी जिनपिंग यांना दिली.
दरम्यान आपसात निर्माण होणारा कोणताही पेचप्रसंग सोडवण्यासाठी संवादाला वाव ठेवण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाल्याचे सांगण्यात येते.
त्याच वेळी, अध्यक्ष शी यांनी अधोरेखित केले की चीन आणि अमेरिका यांच्यात मतभेद आहेत आणि यापुढेही राहतील. महत्त्वाचे म्हणजे असे मतभेद नियंत्रणात ठेवणे, आपसांतील सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली असेही व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले.