वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प प्रशासन सातत्याने अवैध स्थलांतरितांवर कारवाई करत आहे. दरम्यान, गुरुवारी अमेरिकेत शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करून हद्दपार करण्यात आले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, यूएस अधिकाऱ्यांनी 538 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे आणि लष्करी विमानाचा वापर करून शेकडो लोकांना हद्दपार केले आहे. एका संशयित दहशतवाद्यालाही अटक – कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “ट्रम्प प्रशासनाने 538 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे, यात एक संशयित दहशतवादी, ट्रेन डी अरागुआ टोळीचे चार सदस्य आणि अल्पवयीनांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या असंख्य गुन्हेगारांताही समावेश आहे.” “ट्रम्प प्रशासनाने शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना लष्करी विमानांद्वारे हद्दपार केले. इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम सुरू आहे. दिलेली आश्वासने पाळली आहेत”, असे त्या म्हणाल्या. व्हाईट हाऊसने पुढे म्हटले आहे की आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सरकार जी कारवाई करत आहे याची ही एक छोटीशी झलक आहे. मेक्सिको सीमेवर पुन्हा भिंत बांधली जाईल – डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वप्रथम, त्यांनी बायडेन प्रशासनाचे 78 निर्णय रद्द केले. त्याचवेळी अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. याशिवाय मेक्सिको सीमेवर पुन्हा भिंत बांधणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.