US-Iran conflict : अमेरिका-इरान संघर्ष पुन्हा पेटला; तीन तेल टँकर उद्ध्वस्त, अमेरिकेचा मोठा हल्ला
अमेरिका आणि इरानमधील तणाव पुन्हा वाढला. अमेरिकन लष्कराने इरानच्या तीन तेल टँकरवर हल्ला केल्याचा दावा केला असून, नौदलाच्या जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ल्याचाही आरोप केला आहे.

US-Iran conflict : अमेरिका आणि इरानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकन लष्कराने शनिवारी इरानच्या तीन तेल टँकरवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. इरानने अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकन लष्कराच्या म्हणण्यानुसार, एक विमानवाहू युद्धनौका आणि एक विध्वंसक जहाज परिसरात गस्त घालत असताना इरानकडून कोणतीही चिथावणी नसताना अनेक हल्ले करण्यात आले. मात्र, अमेरिकन जहाजांनी सर्व क्षेपणास्त्रे चुकवली. या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकन जवानाला दुखापत झाली नसल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले.
दोन टँकर निष्क्रिय, एक उद्ध्वस्त –
इरानच्या हल्ल्यानंतर अमेरिकन लष्कराने इरानच्या तेल टँकरवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात दोन टँकर कायमस्वरूपी निष्क्रिय करण्यात आले, तर रिकामा असलेला तिसरा टँकर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
https://t.co/5pgT0gZM7q pic.twitter.com/Ukt30V8U83
— DOW Rapid Response (@DOWResponse) September 5, 2026
हे टँकर इरानच्या कथित ‘शॅडो नेटवर्क’चा भाग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून इरानच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि त्यांच्याशी संबंधित सशस्त्र संघटनांना आर्थिक मदत मिळत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
हल्ल्याचे कथित व्हिडिओ फुटेज जारी –
अमेरिकेने या कारवाईशी संबंधित कथित व्हिडिओ फुटेजही जारी केले आहे. त्यानुसार, एका टँकरला खार्ग बेटाजवळ, दुसऱ्याला जास्कजवळ, तर रिकाम्या तिसऱ्या टँकरला ओमानच्या आखातात लक्ष्य करण्यात आले.
यापूर्वी इराननेही अमेरिकेवर खार्ग बेटाजवळ फारसच्या आखातात असलेल्या इराणी तेल टँकरवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या घटनेनंतर दोन्ही देशांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र झाले आहेत.
आठवडाभरानंतर पुन्हा संघर्ष –
अमेरिकेची ही कारवाई दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा सुरू झाल्यानंतर करण्यात आली आहे. जवळपास महिनाभराच्या शांततेनंतर सुमारे आठवड्यापूर्वी पुन्हा हल्ले सुरू झाले. हा संघर्ष 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांपासून सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर दोन्ही देशांनी लष्करी आणि आर्थिक दबाव वाढवला. चर्चेच्या माध्यमातून तणाव कमी करण्याचे प्रयत्नही झाले; मात्र ही चर्चा निष्फळ ठरली.
दरम्यान, गरज भासल्यास इरानच्या तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा अमेरिकेने दिला आहे. त्यामुळे आखाती भागातील तेलपुरवठा आणि समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.





