न्यूयॉर्क – अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातल्या एका दुकानामध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय वंशाचे ५६ वर्षीय एक व्यक्ती आणि त्यांची २४ वर्षीय कन्या ठार झाली आहे. या गोळीबारासंदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. गोळीबाराची घटना घडली तेव्हा प्रदीपकुमार पटेल आणि त्यांची मुलगी अॅकोमॅक काउंटीमधील लँकफोर्ड हायवेवरील दुकानात काम करत होते. अॅकोमॅक काउंटी व्हर्जिनियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे. दिनांक २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर लगेच पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस आले तेव्हा प्रदीपकुमार मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. इमारतीमध्ये अधिक तपास घेतला असता एका महिलेला गोळ्या लागल्याचे आढळून आले. प्रदीपकुमार यांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. तर जखमी महिलेला सेंतारा नॉर्डफ्लॉक जनरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला मृत प्रदीपकुमार यांची कन्या असल्याचे नंतर निष्पन्न झाले. गोळीबाराच्या संबंधात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे अॅकोमॅक काउंटी शेरिफ्सनी गुरुवारी उशिरा जाहीर केले. जॉर्ज फ्रेझियर डेव्हॉन व्हार्टन असे अटक करण्यात आलेल्या ओनानकॉक येथील ४४ वर्षीय व्यक्तीचे नाव असून तो सध्या अॅकोमॅक तुरुंगात आहे. त्याच्यावर खून, खून करण्याचा प्रयत्न, बंदुक बाळगणे आणि गंभीर गुन्ह्यात बंदुकीचा वापर करण्याचे दोन आरोप ठेवण्यात आले आहेत. गोळीबारामागील नेमका हेतू स्पष्ट होऊ शकलेला नाही. मरण पावलेले दोघेही आपले नातेवाईक होते, असे दुकानाचे मालक परेश पटेल यांनी सांगितले.