रुग्णवाहिकांची अवस्था “चिंताजनक

सुविधांचा अभाव ः अत्यवस्थ रुग्ण नेताना नातेवाईकांची धाकधूक
14 पैकी केवळ 8 रुग्णवाहिका उपलब्ध

पिंपरी  – रुग्णांसाठी दिवस-रात्र देवदूत ठरणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्णवाहिकांची अवस्था “चिंताजनक’ झाली आहे. रुग्णवाहिकांमधील रुग्णवाहिकेत ऑक्‍सिजन किटचा अभाव, औषधोपचार पेटीची दूरवस्था, खराब झालेला पत्रा, तुटलेल्या अवस्थेतील वायपर, खराब झालेला सायरन, लाईटची दूरवस्था अशा परिस्थितीत रुग्णांची ने-आण केली जात आहे. रुग्णवाहिकांची स्थिती पाहता अत्यवस्थ रुग्ण नेताना रुग्णांच्या नातेवाईकांची धाकधूक होत आहे. याचबरोबर, वायसीएम रुग्णालयात 14 रुग्णवाहिका असून सद्यस्थितीत आठ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत आहेत. तसेच, रुग्णवाहिकांची साफसफाई वेळोवेळी केली जात नसल्याने रुग्णवाहिकेत दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिका विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करते. मात्र, या ठिकाणीही शिबिराचे साहित्य त्याच अवस्थेतील रुग्णवाहिकेतून घेऊन जात असल्याचा प्रकार घडत आहे. रुग्णवाहिकांची दूरवस्था झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वायसीएम रुग्णालयातील रुग्णवाहिका महापालिका व जिल्ह्यातंर्गत रुग्णांना सेवा देते. मात्र, रुग्णालयातील सर्व रुग्णवाहिका जुन्या असून एकही रुग्णवाहिका अत्याधुनिक नाहीत. यामुळे, एखाद्या रुग्णाला अत्यवस्थ स्थितीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघातस्थळावरुन अत्यवस्थ रुग्ण आणताना गर्दीतून लवकर वाट मिळण्यासाठी सायरन बसविलेला असतो. मात्र, या रुग्णवाहिकांचा सायरन मध्येच बंद पडत असल्याची भयावह स्थिती रुग्णवाहिकांची झाली आहे. चालकांना जिवावर उदार होऊन रुग्णवाहिका चालवावी लागत आहे. रुग्णवाहिकांमधून रात्री-अपरात्री रुग्ण नेले जात असल्याने सायरन, वायपर, औषधोपचार पेटी, चांगल्या प्रकारचे स्ट्रेचर उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.

चालकांना वेळेवर पगार नाही
रुग्णवाहिकांसाठी 26 चालक असून तीन शिफ्टमध्ये काम चालते. यामधील, 17 चालक कायम तत्वावर काम करत असून 9 चालक मानधन तत्वावर आहेत. मानधन तत्वावर काम करणाऱ्या चालकांचे पगार महिन्याच्या 20 तारखेनंतर होत असल्याने कुटुंबाचा उदरर्निवाह चालविताना कसरत करावी लागत आहे. याचबरोबर, मानधन तत्वावरील चालकांचा पगार 11 हजार सातशे रुपये आहे. मागील काही महिन्यांपासून चालकांचे पगार वाढविण्यात आल्याचे सांगितले जात असून पगारात कोणतीही वाढ मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.

शेवटच्या गावापर्यत पोहोचणार का?
वायसीएम रुग्णालयाच्या रुग्णवाहिका राज्यभरात कुठेही रुग्णांसाठी उपलब्ध केल्या जात होत्या. परंतु, मागील काही वर्षापासून वायसीएमच्या रुग्णवाहिका केवळ जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपलब्ध असतात. परंतु, रुग्णवाहिकांची स्थिती पाहता जिल्ह्याच्या शेवटच्या गावापर्यत रुग्णवाहिका पोहचणार का? अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. खूप मोठ्या विस्तारात रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी लवकरात-लवकर रुग्णवाहिका सुस्थितीत आणण्याची गरज आहे.

वीसहून अधिक रुग्णवाहिकांची गरज
वायसीएम रुग्णालयात एकूण 14 रुग्णवाहिका असून त्यामधील दोन शववाहिका आहेत. तीन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडलेल्या आहेत. तर, गेल्या चार महिन्यापासून तीन वाहिका कार्यशाळेत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या आहेत. यामुळे, सद्यस्थितीत रुग्णांच्या सेवेसाठी आठ वाहिका उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा आवाका पाहता व मोठा विस्तार लक्षात घेता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे वीसहून अधिक रुग्णवाहिकांची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

वायसीएम रुग्णालयात सद्यस्थितीत आठ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहेत. तसेच, काही रुग्णवाहिकांची दुरुस्ती करण्याचे काम चालू आहे. मात्र, पुढील काळात चार ते पाच रुग्णवाहिका लवकरात-लवकर उपलब्ध केल्या जातील.

डॉ. पवन साळवे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.