अंबरनाथ | ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत देशातील राजकारणात चर्चेत येईल अशी मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने अंबरनाथच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित युतीमुळे भाजप नगरपरिषदेत बहुमतात येणार असून, शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला असतानाच, अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या युतीवर शिवसेना शिंदे गटाने तीव्र टीका करत याला ‘अभद्र युती’ असे संबोधले आहे. भाजप–काँग्रेस–राष्ट्रवादी यांची मोट अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ असे एकूण ३२ नगरसेवक एकत्र आल्याने भाजपच्या नेतृत्वाखाली बहुमताचा आकडा पूर्ण होणार आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले या आधीच नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. आता या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजपची सत्ता अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. या युतीवर टीका करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी, “काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणाऱ्या भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी करत शिवसेनेचा घात केला,” असा आरोप केला आहे. भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, “गेल्या २५ वर्षांत भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर तीच खरी अभद्र युती ठरली असती.” तसेच, अंबरनाथ नगरपरिषदेबाबत शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीच्या दृष्टीने अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही त्यांनी केला. २३ जागा जिंकूनही शिंदे गट सत्तेपासून दूर या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तेजश्री करंजुले आणि शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. नगराध्यक्षपद भाजपने जिंकले असले, तरी शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक २३ नगरसेवकांची ताकद मिळवली. तर भाजपला १६, काँग्रेसला १२ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. मात्र, सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात शिंदे गट अपयशी ठरला आणि अखेर भाजप–काँग्रेस युतीमुळे त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले. या अनपेक्षित युतीमुळे अंबरनाथच्या राजकारणातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.