Ambegaon News – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील खारावस्तीवर शनिवार, दि.१६ रोजी सायंकाळी महावितरणच्या वीजपुरवठ्यात अचानक हाय व्होल्टेज निर्माण झाल्याने पंधरा ते वीस घरांतील घरगुती उपकरणे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले.अचानक आलेल्या तीव्र वीजप्रवाहामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. खारावस्ती येथे महावितरणचा १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असून, सायंकाळच्या सुमारास अचानक व्होल्टेज वाढल्याने अनेक घरांतील बल्ब, फॅन, फ्रिज तसेच इतर विद्युत उपकरणे बंद पडली. काही ठिकाणी विजेचा करंट जाणवत असल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतल्याचे भाऊ पोंदे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी विशाल दौंड यांनी रात्री उशिरा ट्रान्सफॉर्मर बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवार दि.१७ रोजी सकाळी तांत्रिक तपासणी करण्यात आली असता ट्रान्सफॉर्मरचे अर्थिंग कट झाल्याचे निदर्शनास आले. तसेच झाडांच्या फांद्या तारा एकमेकांना घासत असल्याने बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करून पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी माहिती महावितरणचे जनमित्र उमर शेख यांनी दिली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी महावितरणकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. “अचानक हाय व्होल्टेज आल्याने घरातील अनेक उपकरणे जळाली. काही ठिकाणी करंटही जाणवत होता. आधीच आर्थिक अडचणीत असताना आता अतिरिक्त नुकसान सहन करावे लागत आहे. – संदीप पोखरकर, माजी उपसरपंच, पोंदेवाडी. “ट्रान्सफॉर्मरचे अर्थिंग तुटल्यामुळे आणि झाडांमुळे तारा एकमेकांना लागल्याने बिघाड झाला होता. तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.” – नितेश भसारकर, सहाय्यक अभियंता, महावितरण, निरगुडसर.