प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आमदार तथा माजी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या २०२५-२०२६ सालच्या पूरक मागण्यांना शासन स्तरावरून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत महत्त्वाच्या सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण ४९ कोटी ८९ लक्ष ६७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.तालुक्यातील आदिवासी भागातील शैक्षणिक सुविधांच्या उभारणीसाठी तीन महत्त्वाची कामे सुरू आहेत. या चालू कामासाठी २ कोटी ५ लक्ष ६७ हजार रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये गोहे (ता.आंबेगाव) शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतर निधी ७० लाख ६९ हजार, तेरुंगन शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे उन्नतीकरण निधी ६५ लाख ७६ हजार, आहुपे (ता. आंबेगाव) आदर्श शाळा उभारणीचे काम निधी ६९ लाख ३० हजार, या तिन्ही प्रकल्पांमुळे आदिवासी मुलांना शिक्षणासाठी अधिक भक्कम व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामीण रुग्णालय मलठण येथील फर्निचर, सिमेंटकरण व विजेचे काम यासाठी निधी २ कोटी, ग्रामीण रुग्णालय पाबळ फर्निचर खरेदी निधी १ कोटी २३ लाख, २०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय बांधकाम निधी ४४ कोटी मंजूर आहेत. यामुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होऊन नागरिकांना उपचारासाठी पुण्यात जाण्याची गरज कमी होणार आहे. तसेच तंत्रशिक्षण विभाग सुरक्षा व सुविधा वाढ शासकीय तंत्रनिकेतन, आंबेगाव इमारत दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था बळकटीकरण करण्यासाठी ६१ लाख रुपयांच्या निधी उपलब्ध केला आहे.या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदार दिलीप वळसे पाटील यांचे स्थानिकांनी कौतुक केले आहे.