“स्वतःची जहागिरी असल्यासारखे..” भुमरेंसोबतच्या राड्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

औरंगाबाद : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीत हे दोन नेते एकमेकांच्या समोर आले होते. या दोन्ही नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दोनही नेत्यांच्या या राड्यानंतर आता अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वतःची जहागिरी असल्यासारखे जर पालकमंत्री वागत असतील तर त्यांच्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती. सत्ताधारी आमदारांनाही तसंच वाटत होतं. मी त्यांचीही भूमिका मांडली” असं अंबादास दानवे यावेळी म्हणाले. अतुल सावे, हरीभाऊ बागडे,आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार,या सगळ्याच आमदारांना तसं वाटत होतं. मी फक्त ती भूमिका आक्रमकपणे मांडली असं देखील दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नेमकं काय घडलं
विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या आरोपाला खोडून काढले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे चढ्या आवाजात संदीपान भुमरे यांच्याशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला.
भुमरेंचे उत्तर
बैठकी दरम्यान दोन्हही नेत्यांचा आवाज वाढला होता. बैठकीवेळी अंबादास दानवे यांना आवाज का वाढवावा लागला? असा प्रश्न प्रसारमाध्यमंच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर विरोधी पक्षनेत्याचं ते कामच आहे असं मत संदीपान भुमरेंनी व्यक्त केलं.





