मुंबई : उद्धवसेनेचे गटनेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. या आठवड्यातील शुक्रवारी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपणार असल्याने, बुधवारीच सभागृहात अंबादास दानवेंचा निरोप समारंभ पार पडला. सध्याची महाविकास आघाडीची विधानसभेतील स्थिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणूका पाहता अंबादास दानवेंना सहभागृहात परतण्याचा मार्ग खडतर असण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे ऑगस्ट २०१९ मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ऑगस्ट २०२२ मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती. त्यानंतर अंबादास दानवे हे शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्याचा आक्रमक चेहरा म्हणून समोर आले. मात्र आता ते विधान परिषदेत नसल्याने उद्धवसेनेला आगामी काळात आक्रमक नेत्याची उणीव जाणवण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. तर विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना पुन्हा विरोधी पक्षनेता होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच संबंधित विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होईल. त्यामुळे अंबादास दानवे यांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र त्यानंतरही अंबादास दानवे यांचा विधानसभा सदस्यांमार्फत निवडून येण्याचा पर्याय विचारात घेतला, तर खडतर आहे. कारण सध्या उद्धवसेनेकडे केवळ २० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी आवश्यक असलेल्या ४० ते ४५ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक शक्य नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांना पुन्हा विधान परिषदेवर येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.