नवी दिल्ली – अमेरिकेतला मोठा उद्योगसमूह अॅमेझॉनने भारतात 2030 पर्यंत 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आयोजित अॅमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली. विकसित भारताच्या उद्दिष्टांशी अॅमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की, या गुंतवणुकीतून 10 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात क्षमतावाढ, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधाविकास, रोजगारनिर्मिती आणि लहान उद्योगांना पाठिंबा ही या गुंतवणुकीची उद्दिष्टं असतील. याआधी मायक्रोसॉफ्टने 17 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून, या गुंतवणुकीमुळे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पायाभूत सुविधा, कौशल्ये आणि सार्वभौम क्षमता निर्माण करता येतील आणि भारताच्या महत्वाकांक्षी योजनांना सहाय्य मिळेल. अॅमेझॉन भारतात करणार असलेली ही गुंतवणूक इतकी जास्त आहे की अॅमेझॉनच्या व्यासपीठावरून भारतातून होणारी निर्यात 2030 पर्यंत तब्बल 80 अब्ज डॉलर इतकी होण्याची शक्यता आहे. सध्या अॅमेझॉनच्या व्यासपीठावरून भारतातून 20 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात होते. आतापर्यंत या कंपनीने 40 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि आणखी 35 अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील पाच वर्षात केली जाणार आहे असे अगरवाल म्हणाले. अमेझॉनची ही गुंतवणूक आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात होत असून यामध्ये डिजिटल पायाभूत सुविधा फुलफिलमेंट सेंटर, लॉजिस्टिक्स, डेटा सेंटर, डिजिटल पेमेंट, तंत्रज्ञान विकास इत्यादी क्षेत्राचा समावेश आहे अमेझॉनने भारतातील 12 दशलक्ष छोट्या उद्योगाचे डिजिटायझेशन करण्यात मदत केली आहे. यामुळे हे उद्योग आगामी काळात अॅमेझॉनच्या व्यासपीठावरून मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकणार आहेत.