प्रभात वृत्तसेवा इंदापूर – लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित शिक्षणसंस्थांनी संविधान दिनानिमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. राष्ट्रीय मूल्यांचे दर्शन घडवणारा हा सोहळा भव्यदिव्य उत्साहात पार पडला.विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी आणि विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन विशेषपणे साजरा करण्यात आला. या उपक्रमाची विशेष आकर्षकता म्हणजे 5500 विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन करून भारतीय लोकशाहीला एकसुरात सलामी दिली. विद्यार्थ्यांच्या आसनरचनेतून 75 वा संविधान दिन हे अक्षरलेखन आणि अशोकचक्र साकारण्यात आले. हा दृश्य सोहळा उपस्थितांना थक्क करणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधान उद्देशिकेचे पूजन करून झाली. प्रास्ताविक प्रा. गणेश पवार यांनी केले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेतील सादरीकरणातून स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास जिवंत केला. देशभक्तिपर गीत आणि ऑपरेशन सिंदूरवरील नृत्य सादरीकरणाने वातावरण अधिकच भारावून गेले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमच्या सामूहिक गाण्याने झाली. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे पाटील, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, हृषीकेश ढोले, विविध कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उपस्थितीत सहभागी झाले. अग्निवीर निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार कॉमर्स विभागातील विद्यार्थी सिद्धार्थ कांबळे याची इंडियन आर्मी – अग्निवीर मध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा ढोले यांनी संविधानिक कर्तव्यांची जाणीव ठेवत लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी भारतीय संविधानातील वैशिष्ट्ये आणि समानतेच्या मूल्यांचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली.