Amar Preet Singh : कोणतेही लक्ष्य आवाक्याबाहेरचे नसते; एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी व्यक्त केले मत
१,२०० किमी रुंद आणि २०० किमी खोल आघाडीवर केलेल्या सुनियोजित हल्ल्यांनी हवाई दलाची कार्यक्षम क्षमता प्रदर्शित केली आहे, असे प्रतिपादन एअर चीफ मार्शल अमरप्रीतसिंग (Amar Preet Singh) यांनी रविवारी सांगितले.

Amar Preet Singh : हवाई शक्ती हेच भारताचे प्राथमिक प्रत्युत्तर आणि एक सामरिक प्रतिबंधक योजना आहे. ऑपरेशन सिंदूरने हे दाखवून दिले आहे की भारतीय हवाई दलाच्या आवाक्याबाहेर कोणतेही लक्ष्य नसते. १,२०० किमी रुंद आणि २०० किमी खोल आघाडीवर केलेल्या सुनियोजित हल्ल्यांनी हवाई दलाची कार्यक्षम क्षमता प्रदर्शित केली आहे, असे प्रतिपादन एअर चीफ मार्शल अमरप्रीतसिंग (Amar Preet Singh) यांनी रविवारी सांगितले.
आपाल्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पीटीआयशी बोलताना, हवाई दल प्रमुखांनी (Amar Preet Singh) ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचे वर्णन भारतीय हवाई दलाच्या क्षमता-केंद्रित दृष्टिकोनाची एक पुष्टी असे केले. त्यामध्ये लढाऊ परिणामकारकता वाढवण्यासाठी विमाने, सेन्सर्स, शस्त्रे आणि नेटवर्क्स एकत्रित केले जातात. गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त प्रदेशांमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले करण्यात आले.
अमरप्रीत सिंग पुढे म्हणाले की, कोणत्याही ऑपरेशनच्या दृष्टीने एक धडा महत्त्वाचा ठरतो: शत्रू डावपेच बदलतो तेव्हा आपण नेहमी अनेक पर्याय आणि वेगाने जुळवून घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे. या लवचिकतेमुळे भारतीय हवाई दलाला आपला प्रतिसाद जुळवून घेण्यास आणि तणाव वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे.
या मोहिमेचे यश कोणत्याही एका शस्त्रातून किंवा प्रणालीतून नव्हे, तर अचूक गुप्त माहिती, नेटवर्कवर आधारित कारवाया, दूरस्थ आणि अचूक मारा करणारी शस्त्रे, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र, स्तरित हवाई संरक्षण आणि मानवरहित हवाई प्रणाली विरोधी यंत्रणा यांच्या एकत्रित वापरामुळे मिळाले. एअर चीफ मार्शल म्हणाले की, काही स्वदेशी बनावटीच्या शस्त्रप्रणालींनी अपवादात्मक कामगिरी केली आणि शत्रूच्या हद्दीत खोलवर जाऊन जबरदस्त प्रहार केले.
या संपूर्ण मोहिमेदरम्यान शून्य अतिरिक्त नुकसान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे भारतीय हवाई दलाने पालन केले. भारताच्या स्वदेशी, नेटवर्कवर आधारित हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानी लष्कराने डागलेल्या मोठ्या संख्येने ड्रोन आणि दूरस्थ मारा करणाऱ्या शस्त्रांचा यशस्वीपणे सामना केला. आक्रमण आणि संरक्षण यांनी एकमेकांना बळकटी दिली, आणि नेमके हेच एका क्षमता-केंद्रित दलाचे उद्दिष्ट असते.
हवाई दलाची २०४७ साठीची दूरदृष्टी
अमरप्रीत सिंग (Amar Preet Singh) म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या दीर्घकालीन योजना विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय दूरदृष्टीशी सुसंगत आहेत. विकसित भारत सुरक्षित आणि लवचिक असला पाहिजे. संरक्षण दल दूरदृष्टी २०४७ मध्ये देखील या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी एकात्मिक, बहु-क्षेत्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत लष्कराची कल्पना आहे.
भारतीय हवाई दलासाठी याचा अर्थ असा आहे की, संघर्षाच्या सर्व स्तरांवर भारताच्या विस्तारणाऱ्या आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक हितांचे संरक्षण करण्यास सक्षम अशा बहु-क्षेत्रीय एरोस्पेस दलामध्ये विकसित होणे. भारतीय हवाई दलाची क्षमता दूरदृष्टी योजना-२०४७ उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित दीर्घकालीन प्राधान्यक्रम निश्चित करते आणि वेळोवेळी अद्ययावत होणाऱ्या १०-वर्षीय योजनांमध्ये तिचा समावेश होतो.






