विसगांव, आंबवाडे, हिर्डोशी, महुडे आदी ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
भोर- भोर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या “हॅट्ट्रिक’साठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील विसगावखोरे, आंबवडे खोरे हिर्डोशी खोरे, शिंद महुडे खोरे, वेळवंड-पसुरे खोरे तसेच महामार्गा लगतच्या गावागावांत “घर टू घर’ प्रचार करुन मतदारांशी प्रत्यक्ष संवादसाधला जात आहे.
आमदार थोपटे यांनी पाचर वार्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देणारी पत्रके या “घर टू घर’ प्रचार दौऱ्यात मतदारांना वाटप करण्यात येत आहे. तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी शेतीच्या बांधावरही जावून मतदारांना संबोधित करीत आहेत. या प्रचार मोहिमेत कॉंग्रेसचे उद्योजक अनिल सावले, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव थोपटे, अनंत दुधचे संचालक तथा खानापुर ग्रामपंचायतीचे सरपंच भिकोबाभाऊ थोपटे, उद्योजक आनंद आंबवले, राष्ट्रवादीचे मनोज खोपडे, पै.शिवाजी खोपडे, अतुल किंद्रे, शिवाजी पाटणे, कारीचे माजी सरपंच बाळासाहेब घोलप, सुभाष कोंढाळकर, अरुण मालुसरे, सुरेश राजीवडे, ज्ञानोबा धामुणसे, पै.बबनराव खाटपे, विजय भालेघरे, भोर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, जगन्नाथ गोळे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा दानवले, अंकुश खंडाळे, पसुरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश देशमुख, बाळासाहेब धुमाळ यांच्यासह भागाभागातील कार्यकर्ते झाले आहेत.
अनिल सावले म्हणाले की, आमदार थोपटे यांनी भोर तालुक्यात विकासकामांचे माध्यमातून कोट्यवधींचा निधी मिळवला असून विकासाची गंगा तालुक्यात आणली आहे. मात्र, ग्रामीण भागातील विकास काय असतो हे ज्यांना माहीत नाही तसेच पाच वर्षांतून एकदाच मते मागण्यासाठी येतात, त्यांचा विचार जनतेने न करता त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही आमदार थोपटे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. यावेळी राज्यात आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल असा विश्वास आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशा नुसार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये मनोमिलन झाले असल्याने आम्हाला आमदार थोपटे यांच्या विजयाची खात्री असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.