एएम इन्फोवेब फाऊंडेशनतर्फे ससून रुग्णालयाला ४० व्हीलचेअर, ४० स्ट्रेचरचे दान!

विश्रांतवाडी – कल्याणीनगर येथील एएम इन्फोवेब फाऊंडेशन आणि बंदे खुदा ट्रस्ट यांनी ससून रुग्णालयाला ४० व्हीलचेअर आणि ४० स्ट्रेचर भेट दिले आहेत. रुग्णालयात व्हीलचेअर आणि स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत असल्याची माहिती मिळताच फाऊंडेशनने तात्काळ पुढाकार घेत ही सुविधा उपलब्ध करून दिली. या समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
फाऊंडेशन वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवते. या प्रसंगी एएम इन्फोवेबचे अध्यक्ष अली मर्चन्ट, संचालक आजम शेख, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, ससूनचे डीन एकनाथ पवार, अधीक्षक यल्लाप्पा जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेबूब नदाफ यांच्यासह डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून ससूनमध्ये व्हीलचेअर आणि स्ट्रेचर नादुरुस्त असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत होता. काही वेदनादायक घटनांमध्ये रुग्ण किंवा मृतदेहांना बेडशीटमध्ये गुंडाळून वॉर्डात न्यावे लागले. गेट ते वॉर्डाचे अंतर जास्त असल्याने हा त्रास आणखी वाढला होता. ताडीवाला रोडचे सामाजिक कार्यकर्ते महेबूब नदाफ यांनी ही समस्या फाऊंडेशनच्या लक्षात आणून दिली. फाऊंडेशनने त्वरित प्रतिसाद देत गरज पूर्ण केली.
एएम इन्फोवेब परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत हे मोलाचे कार्य केले. समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतो, हे या उपक्रमाने दाखवून दिले. त्यांच्या या विधायक कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





