Supriya Sule : “आधीच 9 लाख कोटींहून अधिक कर्जाचा बोजा..”; सुप्रिया सुळेंनी कडक शब्दांत सुनावलं म्हणाल्या “ही आर्थिक उधळपट्टी…”
Supriya Sule : १.१० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करून 'शक्तीपीठ महामार्ग' प्रकल्प हट्टाने केला जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दिली.

Supriya Sule : राज्य सरकारच्या महत्वकांशी शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी लढा उभा केला आहे. या प्रकल्पावरुन राजकारण देखील तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि अनेक नेत्यांनी यांदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशातच आता या महामार्गावरून शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल करत राज्यावर आधीच ९ लाख कोटींहून अधिक कर्जाचा बोजा आहे. तरीही सुमारे १.१० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्प हट्टाने केला जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दिली.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
राज्यावर आधीच ९ लाख कोटींंहून अधिक कर्जाचा बोजा आहे. तरीही सुमारे १.१० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्प हट्टाने केला जात आहे. ही अत्यंत चिंताजनक आणि विचार करायला लावणारी बाब आहे. राज्याच्या तिजोरीवर वाढणारा हा भार सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा करणारा असून ही आर्थिक उधळपट्टी धोकादायक ठरणार आहे. असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती करुन ते चांगले केले जाऊ शकतात. रस्तेदुरूस्ती ही जनतेची मोठी मागणी आहे, त्याकडे लक्ष न देता जनतेवर कर्जाचा बोजा चढवून उलट आणखी एक अवाढव्य प्रकल्प कशासाठी? असा सवाल उपस्थित करत मोठ्या प्रमाणात शेतजमीन आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पाची व्यवहार्यता खरोखरीच तपासून पाहण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.
राज्यावर आधीच ९ लाख कोटींंहून अधिक कर्जाचा बोजा आहे. तरीही सुमारे १.१० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्प हट्टाने केला जात आहे. ही अत्यंत चिंताजनक आणि विचार करायला लावणारी बाब आहे. राज्याच्या तिजोरीवर वाढणारा हा भार सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा…
— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2026
शक्तीपीठ महामार्गाविषयी
हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग (नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग) महाराष्ट्रातील सुमारे ८५६ किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी असणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे. हा महामार्ग विदर्भातील वर्धा जिल्ह्यापासून (पवनार) सुरू होऊन मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून जात थेट गोव्याच्या सीमेवरील पत्रादेवी (सिंधुदुर्ग) पर्यंत जाणार आहे. यामुळे नागपूर ते गोवा प्रवास १८-२० तासांवरून केवळ ७-८ तासांवर येणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील एकूण १३ जिल्ह्यांमधून आणि सुमारे ४० तालुक्यांमधून जाणार आहे.






