कार्ला – दोन वर्षांनंतर चैत्री यात्रेला भरविण्यात आलेल्या एकवीरा देवीच्या पालखीच्या मिरवणुकीत कोकणासह राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले होते. तर राज्यभरातील विविध ठिकाणाहून भाविकांनी याठिकाणी पालख्या आणल्या होत्या. या भाविकांनी परिसरात केलेल्या एकवीरा देवीच्या नावाने उदो,,,उदो,,, असा जयघोष केला. अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. वेहरगाव कार्ल्याची आई एकविरादेवीच्या चैत्र यात्रेला गुरूवारी (दि.7) तारखेला देवीचे माहेरघर देवघर येथील काळभैरवनाथ देवाच्या पालखीने सुरवात झाली होती. आज (दि.8) कार्ला एकवीरा देवी मंदिरात उपसरपंच काजल पडवळ, तलाठी मीरा बोऱ्हाडे, पोलिस पाटील, अनिल पडवळ यांच्या हस्ते सकाळी देवीचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सात वाजता देवीची आरती व पालाखीचे विधिविहित पुजन गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख व गुरव पुजारी प्रतिनिधी यांनी करुन मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली. संपूर्ण परिसरात एकविरा देवीच्या नावाने उदो,,,उदो,,, असा जयघोष केला. लाखो भाविकांनी एकविरादेवी डोंगरावर गर्दी केली होती. करोना निर्बंधामुळे दोन वर्ष यात्रा झाली नव्हती. त्यामुळे गर्दी वाढली होती. परंतु मावळ तालुका तहसील प्रशासन व लोणावळा ग्रामीण पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्तामुळे पालखी सोहळा शांततेत पार पडला. यावेळी मावळ तहसीलदार मधुसूधन बर्गे, लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस निरिक्षक प्रविण मोरे, मंडल अधिकारी मानिक साबळे, व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी एकविरा देवी यात्रेसाठी विशेष नियोजन केले होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासठी विशेष काळजी घेतली जात होती. यात्राकाळात पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रा काळात पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक प्रविण मोरे, उपनिरिक्षक अनिल लवटे, सचिन बनकर, नीलेश माने, मंडल अधिकारी मानिक साबळे, ग्रामपंचयात सरपंच अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील पोलिस पाटील ग्रामस्थ, पुजारी,गुरव मंडळी यांच्यासह सर्व अधिकारी स्वत: मंदिर व मंदिर परिससरात फिरुन सोयीसुविधा कायदा व्यवस्थेची पाहणी करत होते. राज्यभरातुन गडावर पालख्या दाखल या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या देवीची पालखी व पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी व पालखीचे दर्शन घेण्यासाठी कोकणासह राज्यभरातील लाखो भाविक या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आले होते. एकविरादेवी ही कोळी व आगरी, कुणबी, सोनार बांधवांची कुलदेवता असल्याने मुंबई, कोकण, रायगड या भागातून अनेक पालख्या याठिकाणी आल्या होत्या.