बलुतेदारी बंद झाल्याने विक्री व्यवहार सुरू वीसगाव खोरे – समाजात प्रचलित परंपरा आजही ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही जोपसल्या जातात, दिवाळी सण दहा दिवसावर येऊन ठेपला असल्याने दिवाळीतील लक्ष्मी (केरसुणी) बनविण्यासाठी कारागिरांची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा निर्बंधमुक्त दिवाळीमुळे नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. भोर तालुक्यातील बाजारवाडीत दिवाळी सणासाठी पारंपरिक पूजेसाठी घराची स्वच्छता करणारी केरसुणी की जी दिवाळीत लक्ष्मीपूजेच्या दिवशी रीतसर पुजली जाते, ती बनविण्यात कारागिर मग्न आहेत. आज नायलॉन, कॉटन कापडाचे झाडू, इलेक्ट्रिक ब्लोअर, व्ह्यॅकुम क्लिनरच्या जमान्यात केरसुणी बनवणारा समाज उदरनिर्वाहाबरोबर पारंपरिक संस्कृतीचे जतन करत दिवाळी जवळ आली की केरसुणी बनवत आहे. या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी पूजेसाठी केरसुणीला मागणी वाढली आहे. दिवाळीत हजारो केरसुणींना मागणी असते. कच्च्या मालाच्या एका पेंडीचा दर मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे केरसुणीच्या किमतीतही वाढ झालीआहे. केरसुणी 80 ते 120 रुपये दरात विक्री करण्यात येत असल्याचे विक्रत्यांनी सांगितले. लक्ष्मीपूजनासाठी गरीब-श्रीमंत सर्वच जण केरसुणीची (लक्ष्मी) पजि करतात. पारंपरिक बलुते पध्दतीने वीसगाव खोऱ्यातील घरोघरी केरसुणी विकतात. त्यांना मोबदला म्हणून विविध प्रकारचे धान्य मिळत असे. अलीकडे ती पद्धत बंद होऊन धान्याऐवजी पैशांवर केरसुणी विकल्या जात आहेत. निर्बंध मुक्त दिवाळीमुळे यंदा चांगले पैसे मिळण्याची शक्यता असल्याची माहिती बाजारवाडी (ता. भोर) येथील केरसुणी कारागीर, दत्तात्रय जाधव व बाळासाहेब सपकाळ यांनी सांगितले. बनवण्याची प्रक्रिया केरसुणी बनविण्यासाठी महिना दीड महिना अगोदरच सिंदाडाच्या झाडांचे फड तोडून आणून ते वाळत ठेवून त्याला काठीने झोडून स्वच्छ करून पाण्यात भिजत घालून काही वेळाने त्याचे समान तुकडे केले जाता. यानंतर जुळा तयार केला जातो व तो बांधण्यासाठी घाभोटीच्या फडापासून (शिंदाड्याच्या आतील गर ज्यापासून केरसुणीची मूठ बांधण्याकरीता बनवलेली दोरी) पड तयार करून त्याने केरसुणीची मूठ मजबूत बांधून विंचरून सुंदर केरसुणी तयार करण्यात येते.