Raaka Update: ‘राका’मध्ये अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल? दीपिकाच्या रक्षणासाठी रश्मिकाची दमदार एन्ट्री!
Raaka Update ‘राका’मधील सर्वात मोठा अपडेट अल्लू अर्जुनच्या भूमिकेबाबत आहे. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन एक नव्हे तर तब्बल तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसू शकतो.

Raaka Update: अभिनेता अल्लू अर्जुनच्या आगामी ‘राका’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुन पुन्हा एकदा हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक एटली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दीपिका पादुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या शूटिंगलाही वेग आला असून, आता ‘राका’बाबत काही महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदाना या चित्रपटात दीपिका पादुकोणच्या व्यक्तिरेखेची रक्षक म्हणून दिसू शकते. दीपिकाची भूमिका अत्यंत नाजूक आणि कठीण परिस्थितीत अडकलेल्या महिलेची असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत तिच्या सुरक्षेची जबाबदारी रश्मिकाच्या व्यक्तिरेखेवर असू शकते. दीपिकाचे पात्र प्राचीन वैदिक काळाशी जोडलेले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिका चित्रपटाच्या कथेत महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे.
अल्लू अर्जुन तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये?
‘राका’मधील सर्वात मोठा अपडेट अल्लू अर्जुनच्या भूमिकेबाबत आहे. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन एक नव्हे तर तब्बल तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसू शकतो. यातील एका भूमिकेत तो योद्ध्याच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या भूमिकेत त्याचा डार्क शेड पाहायला मिळू शकतो. मात्र तिसरी भूमिका नेमकी कशी असेल, याबाबत अद्याप गुप्तता ठेवण्यात आली आहे.
चित्रपटाची कथा केवळ एका नायकाभोवती फिरणारी नसून, त्यातील इतर पात्रांनाही महत्त्व दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनसोबत दीपिका, रश्मिका आणि जान्हवी यांच्या व्यक्तिरेखाही कथेला वेगळा आयाम देऊ शकतात.

Raaka update
‘राका’मध्ये दिसणार अनोखे क्रिएचर्स!
या चित्रपटात फँटसीचा मोठा भाग असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात जंगल आणि वन्यजीवांसोबतच काही नवीन आणि काल्पनिक क्रिएचर्स पाहायला मिळू शकतात. वेगवेगळ्या प्रजाती आणि अनोख्या जीवांची कल्पना चित्रपटाच्या व्हिज्युअल जगाला मोठ्या स्तरावर नेऊ शकते.
जान्हवी कपूर आदिवासी मुलीची भूमिका साकारू शकते, अशी चर्चा आहे. तर ऐश्वर्या लक्ष्मीची भूमिका ग्रे शेड असलेली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ‘राका’मध्ये फक्त अॅक्शनच नाही, तर फँटसी, थ्रिल आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचा मोठा मेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
रामोजी फिल्म सिटीमध्ये भव्य सेट
चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठा सेट उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सेटवर चित्रपटाचा इंटरव्हल ब्लॉक आणि अल्लू अर्जुनचे मोठे अॅक्शन सीक्वेन्स शूट केले जाणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ‘राका’बाबत समोर येणाऱ्या या अपडेट्समुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र ट्रिपल रोल, रश्मिकाची भूमिका आणि चित्रपटातील फँटसी जगाबाबत निर्मात्यांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.





