राज्यसभा निवडणुकीत मतदानास परवानगी द्या; नवाब मलिकांचा ईडीकडे अर्ज दाखल

मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज राज्यसभेसाठी मतदान करण्यासाठी 1 दिवसाचा जामीन मंजूर करावा, यासाठी ईडीकडे अर्ज दाखल केला आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या मार्फतही राज्यसभेसाठी मतदान करण्यात यावे यासाठीचा विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे.
नवाब मलिक यांच्या वकिलांच्यामार्फत आज विशेष न्यायलयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यानंतर विशेष न्यायालयाने ईडीला अनिल देशमुख आणि नवाब मलीक यांच्या अर्जावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 8 जून रोजी घेण्याचे निश्चित केले.
दरम्यान, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी)ने अटक केली होती. 7 मार्चपर्यंत त्यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान, प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांमध्ये नवाब मलिक यांची चौकशी होऊ शकली नाही.
तसेच तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे मलिकांना ताब्यात घेऊन चौकशी होणे अधिक गरजेचे आहे असे ईडीतर्फे सांगण्यात आले. या मुद्द्यावरुन न्यायालयाने सात मार्चपर्यंत नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ केली होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या आर्थर रोड तरुंगात न्यायलयीन कोठडीत आहेत.





