वडगाव मावळ – पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधला आहे. विचारधारांना तिलांजली देत सत्तेची समीकरणे जुळविली आहेत. एका स्थानिक स्वराज्य संस्थेत मित्र असलेला पक्ष दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधी आहे. राज्य आणि देश पातळीवर विचारधारांच्या आधारे बनविलेल्या युती-आघाडीच्या उद्देशाला देखील स्थानिक राज्यकत्र्यांना मूठमाती दिली आहे. वरिष्ठ नेत्यांची देखील या खेळास मूक सहमती आहे. मावळ तालुक्यातील वडगाव, तळेगाव, लोणावळा आणि खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये चक्रावून टाकणारी समीकरणे राजनेत्यांनी मांडली आहेत. राज्य पातळीवर विरोधक म्हणून उभे असलेले राजकीय पक्ष स्थानिक सामाजिक समीकरणे आणि गटांच्या ताकदीनुसार एकमेकांची हात मिळवणी करत आहेत. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, ही उक्ती यावेळी खरी ठरत आहे. वडगावात दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-सेना वडगावाच्या स्थानिक राजकारणात नेहमीच संघर्षमय वातावरण असते. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही युती वडगावच्या राजकीय समीकरणात निर्णायक मानली जात आहे. मात्र दुसरीकडे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाने अनपेक्षितपणे हातमिळवणी केली आहे. राज्यात कटुता असतानाही वडगावात दोन्ही गट एकत्र येणे, ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, अंतर्गत समन्वय आणि विरोधी युतीचा दबाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. तळेगावात भाजप-राष्ट्रवादी मित्र तळेगावातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार अशी चर्चा जोरात होती. परंतु स्थानिक वातावरण, जातीय आणि सामाजिक समीकरणे तसेच विरोधी आघाड्यांची ताकद पाहता दोन्ही पक्षांनी एकत्र येणे पसंत केले आहे. लोणावळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लोणावळ्यातील परिस्थिती मात्र इतर शहरांपेक्षा वेगळी ठरली आहे. लोणावळ्यात भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद होते. या मतभेदांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने अखेरीस शरद पवार गटासोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना-आरपीआय युतीचा आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा व अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे कुठे युती-आघाडी आणि कुठे विरोधक हे जनतेलाच कळेनासे झाले आहे. खोपोलीत अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या सेनेसोबत खोपोलीच्या राजकारणातही युतींची कसरत रंगात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटासोबत हातमिळवणी केली आहे. खोपोलीत शेकापचे अस्तित्व आणि प्रभाव लक्षात घेता ही युती स्थानिक पातळीवर फार महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या विरोधात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी एकत्रित येत युती केली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक पक्ष एकमेकांचे विरोधक असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणे संपूर्णपणे वेगळी असतात. त्यामुळे वडगाव, तळेगाव, खोपोली आणि लोणावळा या चारही ठिकाणी पक्षांनी घेतलेले निर्णय राज्यातील राजकीय भूमिकेपासून भिन्न आहेत.