Beed News : वाल्मीक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, विजयसिंह बांगरांच्या पत्नीचा छळाचा गंभीर आरोप

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये वाल्मीक कराड विजयसिंह बांगर यांच्या पत्नीशी संवाद साधताना दिसत आहेत.
यात कराड त्या महिलेला सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्याची विनंती करत असून, त्या बदल्यात मदतीचे आश्वासन देत आहेत. मात्र, महिलेने विजयसिंह बांगर आणि त्यांच्या कुटुंबाकडून झालेल्या छळाचा पाढा वाचत गंभीर आरोप केले आहेत.
या ऑडिओ क्लिपमध्ये महिलेचा म्हणणे आहे की, “विजयसिंह बांगर, त्यांची आई आणि बहीण यांनी मला चार वर्षांपासून छळलं. माझ्या गरोदरपणात बाळ खाली करायला सांगितलं, मला घराबाहेर काढलं, हुंड्यासाठी पाच लाख रुपये घेतले आणि माझ्या वडिलांकडून कर्ज घेऊन ते अजूनही फेडलं जात आहे.
माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ते आलेच नाहीत. त्यांना दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं आहे, असा मला संशय आहे. मला आणि माझ्या मुलाला त्यांनी कधीच आधार दिला नाही.”
पुढे ती म्हणते, “मी सासरी परत जायला तयार आहे, पण ते मला घेऊन जात नाहीत. माझ्या नणंदेने सर्वांना शिकवलं, माझ्यावर खोटे आरोप करतात, माझ्या चारित्र्यावर शंका घेतात आणि मारहाण करतात. त्यांनी मला घाणेरड्या शिव्या दिल्या. मला नांदवायला सांगा, नाहीतर मला माझ्या हक्काची अर्धी संपत्ती द्या.” अशी मागणी त्या महिलेने केली आहे.





