Erik Solheim : अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांवरचे आरोप ही अमेरिकन हेराफेरी; नॉर्वेच्या माजी मंत्र्यांची परखड भूमिका

नवी दिल्ली : अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांवर अमेरिकेच्या विधी विभागाने (डिओजे) लावलेले आरोप हे निव्वळ अमेरिकन हेराफेरीशिवाय दुसरे काही नाही. हे संपल्यानंतर अदानी समूह आणखी मजबूत होईल, असे नॉर्वेचे माजी पर्यावरण मंत्री एरिक सोल्हेम यांनी शनिवारी म्हटले आहे. ते आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
जर अमेरिकेला अदानी समूहाबद्दल काही तक्रारी असतील तर त्यांनी प्रथम भारत सरकारकडे जावे आणि त्यांच्या निदर्शनास आणले पाहिजे. मग तो विषय अमेरिकन कोर्टात न नेता भारतीय न्यायव्यवस्थेकडे नेला पाहिजे. अमेरिकेचे अशा प्रकारचे डावपेच हानिकारक आहेत कारण भारताच्या हरित परिवर्तनासाठी अदानी समूह हे एक महत्त्वाचे वाहन आहे.
अदानींकडे सौर आणि पवन ऊर्जा सुविधा स्थापन करण्याच्या अनेक मोठ्या योजना आहेत आणि अनेक भारतीय राज्यांमध्ये आणि परदेशात मोठ्या प्रमाणात हरित गुंतवणूक आहे, असे सोलहेम यांनी सांगितले. अदानी समूहाने अमेरिकन ऊर्जा सुरक्षा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. देशात 15,000 स्थानिक रोजगार निर्माण करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
अमेरिकेने आपला हुकूमशाही दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्याऐवजी अशा निरर्थक कृतींच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. मला खात्री आहे की अदानी समूह यानंतर आणखी मजबूतपणे पुढे येईल असे सोल्हेम यांनी नमूद केले. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचे कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले सोल्हेम म्हणाले की, अमेरिकेसारखे पाश्चात्य देश जगाचे लवाद आणि न्यायाधीश असण्याची वेळ गेली आहे.
ही भूतकाळाची गोष्ट आहे. हे थांबले पाहिजे. दरम्यान, अदानी समुहाच्या अधिकाऱ्यांवर आरोप सादर करणारे यूएस ॲटर्नी ब्रायन पीस यांनी 10 जानेवारी रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांनंतर, 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. नोव्हेंबरमध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने अदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांवर सिक्युरिटीज फ्रॉडपासून वायर फ्रॉडपर्यंतचे आरोप केले होते. अदानी समूहाने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले.





