Pune District : बँकेच्या नावाने कर्ज फसवणुकीचा आरोप; पोलिसांकडे चौकशीची मागणी
Pune District : विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तींच्या खात्यावर प्रत्यक्षात नियमित उत्पन्न नसतानाही सॅलरी क्रेडिट दाखवून कर्जप्रकरणे मंजूर केली जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

शिरूर : पुणे जिल्ह्यातील ऑक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये बनावट कंपन्यांच्या नावाने सॅलरी अकाउंट उघडून त्याआधारे वैयक्तिक कर्ज, कार लोन तसेच क्रेडिट कार्ड मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा गंभीर आरोप करणारी तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
याबाबत १३ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आल्याचे दिसून येते. निवेदनात ऑक्सिस बँकेच्या वाघोलीसह काही शाखांमध्ये कथितरीत्या सुरू असलेल्या कर्जप्रकरणांबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, काही व्यक्तींकडून बनावट कंपनी दाखवून त्यासंबंधीचे कागदपत्र सादर करून ऑक्सिस बँकेत सॅलरी अकाउंट उघडण्यात येतात. त्यानंतर संबंधित खात्यांवर काही महिन्यांपर्यंत पगार जमा झाल्याचे दाखवून त्या व्यक्तींना क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि कार लोन अशा विविध कर्जांच्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तींच्या खात्यावर प्रत्यक्षात नियमित उत्पन्न नसतानाही सॅलरी क्रेडिट दाखवून कर्जप्रकरणे मंजूर केली जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. अशा प्रकारे बँकेच्या कागदपत्रांचा आणि खात्यांचा कथित गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत काही व्यक्ती व कंपन्यांची नावेही नमूद करण्यात आली असून, ‘आकाश एंटरप्रायजेस’, ‘एस.आर. सोल्युशन’ आदी नावांचा उल्लेख असल्याचे दिसून येते. तसेच शिक्रापूर परिसरातील काही व्यक्तींचा या प्रकारात सहभाग असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.
‘शेकडो कोटींचा फ्रॉड’ असल्याचा दावा
तक्रारीमध्ये हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही लोकांच्या नावावर सॅलरी अकाउंट उघडून त्यांच्या नकळत किंवा त्यांच्या नावाचा वापर करून विविध प्रकारची कर्जे व क्रेडिट कार्ड सुविधा घेतली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाची चौकशी करताना संबंधित बँक शाखांमधील खाते उघडण्याची प्रक्रिया, सॅलरी क्रेडिटची कागदपत्रे, कर्ज अर्ज, केवायसी कागदपत्रे, क्रेडिट कार्ड अर्ज, कर्ज मंजुरीची प्रक्रिया तसेच संबंधित कंपन्यांचे अस्तित्व यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या कथित प्रकारात केवळ बाहेरील व्यक्तींचाच सहभाग आहे की बँकेतील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचीही भूमिका आहे, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारदार निळ वादळ संघटनेचे अध्यक्षा दीपिकाताई भालेराव यांनी केली आहे. बँक खात्यांमध्ये जमा झालेला पगार, कर्ज मंजुरीपूर्वी करण्यात आलेली पडताळणी आणि संबंधित कागदपत्रांची सत्यता याबाबत तपास करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा पद्धतीने सामान्य नागरिकांच्या नावाचा गैरवापर होऊ नये यासाठी संबंधित बँकांनीही दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





