पिंपरी – महावितरण भोसरी कार्यालयांतर्गत करण्यात येत असलेल्या बदल्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कारभार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका शाखेतून अन्य ठिकाणी बदली करायला प्रचलित असलेले नियम डावलून मर्जीतील कर्मचाऱ्यांना मलईदार ठिकाणी नियुक्ती दिल्याचे आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मजिद शेख यांनी सर्व बदल्यांचे आदेश सार्वजनिक करावेत, अशी मागणी केली आहे.
शेख यांनी दिलेल्या निवेदनानुसार भोसरी विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना बदली करताना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देताना नियमांना डावलले गेले आहे. गेल्या काही वर्षात तेच तेच कर्मचारी भोसरी विभागात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
मलईदार शाखा असलेल्या मोशी, भोसरी, चऱ्होली शाखेत यायला अनेकांनी फिल्डींग लाऊन बदल्या करून घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याशिवाय काही कर्मचारी तीन ते चार वेळा बदलून आहे त्याच ठिकाणी परत आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तोडगा न काढल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही शेख यांनी दिला आहे.