Allahabad Bar Association : अलाहाबाद बार असोसिएशनचा संप स्थगित; चौकशी अहवालाची करणार प्रतीक्षा

प्रयागराज : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीला विरोध दर्शवत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी बेमुदत संप सुरू केला. आता रोकड प्रकरणाचा चौकशी अहवाल येईपर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे. वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही दिवसांपूर्वी आगीची घटना घडली. ती आग दिल्ली अग्निशमन दलाने तातडीने विझवली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.
त्यावरून वादात सापडलेले वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते. त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमने केली. ती शिफारस स्वीकारत केंद्र सरकारने बदलीवर शिक्कामोर्तब केले. बदलीच्या शिफारसीवर आक्षेप घेत वकिलांनी संप सुरू केला होता. बदली निश्चित झाल्यानंतर वकिलांनी नाराजी व्यक्त करत वर्मा यांच्या शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर वकिलांनी न्यायालयीन कामकाजात अडथळे येऊ नयेत, पक्षकारांना त्रास होऊ नये या उद्देशातून तूर्तास संपाला स्थगिती दिली आहे. रोकड प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या अहवालाची प्रतीक्षा वकील करणार आहेत.





