दोन डॉक्टर, एका कर्मचाऱ्याचा समावेश : रुग्णांवर उपचार सुरू
पिंपरी – करोनाची लस घेतल्यानंतर तीन जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हे तीनही रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असून आरोग्य कर्मचाऱी आहेत. त्यामध्ये एक खासगी डॉक्टर व कर्मचारी तर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. या तीनही रुग्णांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. चार दिवसांपूर्वीच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्यालाही लस घेऊनही करोनाची लागण झाली आहे. लस घेऊन अशा चार जणांना करोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
करोना रुग्णांच्या थेट संपर्कात येत असल्याने शहरातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये 16 जानेवारीपासून महापालिकेच्या तसेच खासगी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत 18 हजार 61 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लस घेतल्यानंतर 36 दिवसांनी करोनाची लागण झाली आहे. त्यांनी 16 जानेवारीला करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आता चार दिवसांपूर्वी त्यांना अंगदुखी, सर्दी व खोकला अशी लक्षणे दिसू लागली. सोमवारी (दि. 22) त्यांची करोनाची अँटीजेन चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आरटीपीसीआर अहवाल अद्याप आलेला नाही. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तसेच शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांनाही लस घेतल्यानंतर करोनाची लागण झाली आहे. त्या दोघांनीही लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र लक्षणे दिसू लागल्याने करोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एका पालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्यासोबत खासगी रुग्णालयातील एक डॉक्टर व एक कर्मचारी यांनाही लस घेतल्यानंतर करोनाची लागण झाली आहे. या तिघांचाही लसीचा दुसरा डोस बाकी होता. साधारणपणे लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी पुन्हा लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. मात्र यांचा दुसरा डोस बाकी होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पिं. चिं महापालिका