पुणे -जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ शिक्षक अधिवेशनाला जाण्यासाठी रजा मंजूर केली आहे. परंतु एकाच शाळेवरील सर्वच्या सर्व शिक्षकांना सरसकटरजा घेता येणार नाहीत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या होत्या. तरीदेखील अनेक ठिकाणच्या शाळा या बंद राहिल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दोन संघटनांच्यावतीने दोन स्वतंत्र शिक्षक अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 15 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत ही शिक्षक अधिवेशने होणार आहेत. त्यानंतर सलग दोन दिवस महाशिवरात्री आणि रविवारची सुट्टी आली आहे. यामुळे अधिवेशनकाळातील तीन दिवस आणि सरकारी सुट्ट्यांचे दोन दिवस मिळून सलग पाच दिवस सुट्टी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी याबाबतचे योग्य नियोजन करावे आणि अधिवेशनकाळात एकही जिल्हा परिषद शाळा बंद राहणार नाही याचे योग्य नियोजन करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळांना दिला आहे. दरम्यान, केवळ अधिवेशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांनीच रजा घेतलेली असावी. मात्र, अधिवेशनाच्या नावाखाली रजा घेऊन, इथेच फिरणाऱ्या शिक्षकांची रजा मंजूर केली जाणार नाही. तर अधिवेशनात जाणाऱ्यांची रजा होईल, त्यासाठी अधिवेशनातील उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल. या उपस्थितीपत्रकाच्या आधारे सेवापुस्तिकेत नोंद करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केल्या आहेत. तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा बंद झाल्या असतील तर त्याची माहिती घेण्यात येईल, असे सांगितले.