पिंपरी | मावळमधील सर्वच राजकीय पक्षांमध्ये शुकशुकाट

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – वाढत्या उन्हाप्रमाणेच प्रचाराचा जोर वाढत जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदारांना होती. मात्र मावळ तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्ते प्रचारात अग्रेसर होते. प्रचाराच्या अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारीही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू असते. बहुतांशी पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचारफेरी काढतात. मात्र मावळ तालुक्यात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये उत्साह दिसून आला नाही. आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मोजक्याच नेत्यांची धावपळ सुरू होती.
सोमवारी (दि. १३) मावळ लोकसभेसाठी निवडणूक होणार असून यासाठीच्या प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी झाली. इतर स्थानिक निवडणुकीत मतदारांना जसे चोरीछुपे पद्धतीने पैशाचे वाटप केले जाते. तसे पैशाचे वाटप होण्याची शक्यता या निवडणुकीत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्याची गरज यावेळी नाही. उलट स्थानिक नेत्यांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करीत पक्षाचा प्रचार करावा लागत आहे.
मावळ तालुक्यात प्रमुख राजकीय पक्षांकडून घरोघरी मतदान चिठ्ठी वाटपाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदारांना मतदानासाठी कसे नेता येईल, यासाठी बुथ स्तरावर व्युहरचना सुरू आहे. दुपारी कडक ऊन असल्याने मतदार शक्यतो बाहेर पडत नाही.
सोमवारी सायंकाळी हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जर खरोखरच पाऊस आला तर त्याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करून घेणाऱ्या पक्षाला फायदा होईल, असे गणित कार्यकर्ते मांडत आहेत.
वातावरणात बदल
गेल्या काही निवडणुकीत आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असे कार्यकर्ते सांगत असे. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आमचाच उमेदवार निवडून येईल, असे छातीठोकपणे सांगत नाहीत. मतदारांच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही, असेही कार्यकर्ते म्हणत आहेत.
वाड्या-वस्त्यांवर बैठकांना जोर
आपले हक्काचे मतदान कायम राहावे, यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील नेत्याला बैठकीसाठी बोलविण्यात येत आहे. तुमची सगळी कामे आम्ही करू. मात्र यावेळी आमच्या पाहूण्याला मतदान करा, अशी गळही मतदारांना घालण्यात येत आहे.





