राज्यातील भाजपच्या अस्तित्वाचे सगळे श्रेय बाळासाहेबांनाच -संजय राऊत

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, हिंदुहृदयसम्राट अशी ओळख असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती राज्यात साजरी करण्यात येत आहे. याचनिमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला.हे करत असताना त्यांनी भाजपच्या अस्तित्वाविषयी मोठे विधान केले आहे.

मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्र, मराठी माणूस या साऱ्या घटकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राऊतांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय राज्यात भाजपचे सध्या असणारे स्थान पाहता या पक्षाला गावखेड्यात पोहोचवणारेही खुद्द बाळासाहेबच होते ही बाब त्यांनी स्पष्ट केली.

काही वर्षे मागे जात, गतकाळ आठवत महाराष्ट्रात त्यावेळी भाजप नव्हती, शिवसेनेचेच तेव्हा अस्तित्व होते. त्यावेळी बाळासाहेबांनी भाजपशी युती केली. त्यानंतर महाराष्ट्रातील गावागावात भाजपचाही प्रचार आणि प्रसार झाला. आमच्यासाठी ही बाब अभिमानास्पद होती. कारण, सर्वजण ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेच्या बळावर एकत्र आले होते, असे संजय राऊत म्हणाले.

महाविकासआघाडी सरकारच्या निमित्ताने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. ज्यानंतर सेनेवर भाजपकडून वारंवार हिंदुत्त्वाच्या प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. त्याबाबत प्रतिक्रिया देत राऊतांनी भाजपनं यासंदर्भात कोणतेही प्रश्न उपस्थित करु नयेत असं ठणकावून सांगितलं. ‘भाजपनं कोणतेही प्रश्न निर्माण करु नये, कारण त्यांची प्रश्नपत्रिका अजून महाराष्ट्राच्या चाचणी परीक्षेतही आलेली नाही’, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.