नव्या शैक्षणिक वर्षात तरी मिळणार का सर्वांना पुस्तके 

कराड तालुक्‍यात पाठ्यपुस्तके दाखल; लाभार्थीं संख्या 48 हजार 876
कराड – प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्‍यातील शालेय मुलांना नवी पुस्तके हातात देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. कराड तालुक्‍यातील सर्व शाळापर्यंत पुस्तके पोहोच करण्याचे काम सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत निकम यांनी दिली. गतवर्षी लाभार्थींची संख्या 51 हजार 481 इतकी होती. तर यावर्षी ती 48 हजार 876 इतकी आहे. गतवर्षी शाळांकडून मागणी न झाल्याने अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना निम्म्या शैक्षणिक वर्षापर्यंत पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहावे लागले होते. नव्या शैक्षणिक वर्षात तरी सर्वांना पुस्तके मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कराड येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तकांचे संच ठेवण्यात आले असून येत्या दोन दिवसांत सभापती फरिदा इनामदार यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दरम्यान, पंधरा जूनला सर्व जिल्हा परिषद शाळा सुरू होणार असल्याने शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे विभाजन करून पुस्तके पोहोचवली जाणार आहेत. शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना यंदाही मोफत पाठ्यपुस्तके देऊन शाळांनी पुस्तक दिवस साजरा करावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

कराड तालुक्‍यातील मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू शाळेतील मुलांना या योजनेचा लाभ मिळणार असून गतवर्षी इयत्ता पहिलीत 5845, दुसरी 5845, तिसरी 6126, चौथी 6547, पाचवी 6268, सहावी 6850, सातवी 6757 तर आठवीतील 7273 अशा एकूण 51481 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. यावर्षी पहिली 5669, दुसरी 5669, तिसरी 5669, चौथी 5976, पाचवी 6414, सहावी 6126, सातवी 6721, आठवी 6632 अशी एकूण 48 हजार 876 लाभार्थींची संख्या आहे. येत्या दोन दिवसात सर्व शाळांमध्ये पुस्तके पोहोचवणार असल्याचे निकम यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.