कल्याण : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महापालिकांमध्ये महापौरपदासाठी राजकीय गणिते आखली जात असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीतच स्पर्धा रंगताना दिसत आहे. त्यातच, सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) नगरसेवकांची पळवापळवी सुरू असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना मिळून कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर बसवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही केवळ कौटुंबिक भेट असल्याचे दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या भेटीमुळे राजकिय चर्चांना उधाण आले आहे. केडीएमसीत सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. सध्या शिंदे गटाकडे ५३, भाजपकडे ५०, ठाकरे गटाकडे ११, तर मनसेकडे ५ नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गट आणि मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असून, ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक अज्ञातस्थळी गेल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, हे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटाने सांगितले आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या दोन्ही नगरसेवकांवर कारवाईचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे जाहीर केले असून, पुढील काही तासांत कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केडीएमसीतील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.