सर्व लष्करी तळ आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज! भारताने ठणकावून सांगितलं…

नवी दिल्ली | Indian Army Press Conference – “आपली सर्व लष्करी तळ आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, कधीही कोणतीही मोहीम हाती घेण्यास तयार आहेत.’ असे भारतातर्फे आज ठणकावून सांगण्यात आले. राजधानी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हवाई दलाचे महासंचालक (हवाई ऑपरेशन्स) एअर मार्शल एके भारती म्हणाले, “आमच्या भक्कम हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा भारतीय ठिकाणांवर हल्ला करण्याचा डाव हाणून पाडला.”
यावेळी त्यांनी स्वदेशी ‘आकाश’ संरक्षण यंत्रणेच्या उत्तम कामगिरीचं देखील विशेष कौतुक केलं. “एकीकृत हवाई कमांड आणि नियंत्रण यंत्रणेमुळे पाकिस्तानच्या लष्करी कारवायांना खणखणीत प्रत्युत्तर देता आलं,” असंही ते म्हणाले.
भारताचा लढा हा दहशतवादी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांविरुद्ध होता, पण पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना साथ देत हा संघर्ष वाढवल्याचा आरोप त्यांनी केला. | Indian Army Press Conference
तत्पूर्वी, भारतीय सैन्याकडून सोमवारी सकाळी, “जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्र शांततेत गेली. गेल्या काही दिवसांतील ही पहिलीच शांत रात्र होती, कोणतीही अनुचित घटना घडली नाही.” अशी माहिती देण्यात आली होती.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं होतं. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रत्येक आक्रमणाला ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गतच प्रत्युत्तर देण्यात आलं.
शनिवारी भारत आणि पाकिस्तानने एक करार करत संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्रावरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला. हा करार तणाव निवळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. | Indian Army Press Conference





