‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवली जातायेत; मौलाना रझवींची अमित शहांकडे मागणी

मुंबई – सध्या देशभरात चर्चेत असलेला ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील मुघल बादशाह औरंगजेबाच्या चित्रणावरून तरुणांची मने भडकवली जात असून, नागपूरच्या दंगलीसाठी हा चित्रपट कारणीभूत आहे, असा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्याकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अमित शाह यांना पत्र लिहून चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवर कायदेशीर कारवाईची मागणीही केली आहे.
नागपूर दंगल आणि ‘छावा’चा संबंध –
नागपूरमध्ये नुकत्याच उसळलेल्या हिंसाचाराने राज्यभर खळबळ माजवली आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीतून सुरू झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तणाव निर्माण झाला. या घटनेत जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक झाली, ज्यात 34 हून अधिक पोलीस जखमी झाले आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी मुख्य सूत्रधार फहिम खानला अटक केली असून कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मौलाना रझवी यांनी ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाच्या चित्रणामुळे तरुण भडकले आणि हिंसाचाराला चिथावणी मिळाली, असा दावा केला आहे.
औरंगजेबाचं चित्रण वादग्रस्त –
मौलाना रझवी यांनी पत्रात म्हटलं आहे की, “’छावा’ चित्रपटात औरंगजेबाला ज्या पद्धतीने सादर केलं गेलं, त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष पसरला आहे. यातून अशांतता निर्माण होत असून, नागपूरच्या दंगली हे त्याचाच परिणाम आहे.” यापूर्वीही मौलाना रझवी यांनी क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमझानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल आणि त्याच्या मुलीने होळी खेळल्यावर टीका केली होती, ज्यामुळे ते चर्चेत आले होते.
भारतातील मुस्लिम औरंगजेबाला आदर्श किंवा नेता मानत नाहीत –
मौलाना रझवी यांनी स्पष्ट केलं की, “भारतातील मुस्लिम औरंगजेबाला आदर्श किंवा नेता मानत नाहीत. आमच्यासाठी तो केवळ एक मुघल शासक आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही.” त्यांनी नागपूरमध्ये शांतता राखण्यासाठी स्थानिक उलेमा आणि इमामांशी संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं.
बंदीची मागणी, वादाला तोंड –
‘छावा’ चित्रपटाने देश-विदेशात लोकप्रियता मिळवली असली तरी आता त्यावर बंदीची मागणी आणि कायदेशीर कारवाईचा आग्रह यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सरकार काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





