Sanjay Raut : “एका फ्रेममध्ये सगळे” ; खा. संजय राऊतांनी शेअर केला खळबळजनक फोटो, मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत

मुंबईः राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप असलेल्या वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या प्रकरणातील इतरही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर देशमुख यांची मारहाण केल्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यातच आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या हत्या प्रकरणात आष्टीचे आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले असून या सगळ्याचा मास्टरमाईंट वाल्मीक कराड असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत आहेत. आमदार सुरेश धस हे या प्रकरणात रोज नवे खुलासे करत आहेत. बीडमध्ये राखेपासून विटा तयार करण्यात येत असल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच इतर अनधिकृत गोष्टी देखील येथे राजरोजपणे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच संजय राऊत यांनी मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत असल्याचे म्हटले आहे.
राऊतांनी शेअर केला फोटो
संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स या अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे दिसत आहेत. “एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता,” असं संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोसोबत म्हटलं आहे.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी विनाकारक आपला राजीनामा मागितला जात असल्याचे म्हटले आहे. तर मुंडे यांच्याविरोधात पुरावे मिळणार नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांकडून मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.





